Nasrin Mohamedi
चित्रकर्ती: नसरीन मोहमदी.
भारतातील ठळक स्त्री चित्रकारांपैकी एक महत्त्वाचं नाव. त्यांच्या खास अशा रेखांकन शैलीसाठी आणि कल्पकतेसाठी त्यांना नावाजलं गेलं. आता हेच चित्र पहा ना. काही मोजक्या आकारांच्या, रेषांच्या आणि छटांच्या मांडणीतून हे चित्र बनलय. अमूर्त चित्र म्हणजे उगाच वाट्टेल तसे रंग फासण असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. पण एक चांगलं अमूर्त चित्र जन्माला यायला अनेक वर्षांचं दीर्घ चिंतन आवश्यक असतं. ज्यांनी खूप चित्र पाहिली आहेत त्यांना अनुभवाअंती अशा चिंतनशील चित्रामधील ताकद लक्षात येते. आता याच चित्रामध्ये काही मोजक्या आकारांशिवाय उरलेली मोकळी जागा ही मोकळी न राहता त्याला एक अर्थ प्राप्त होतो. मोकळ्या जागेलाही अर्थ प्राप्त करून देणे हे चित्रकाराचं काम. एका आडव्या रेषेला छेदणारी एखादी पांढऱ्या कागदाची सुरळी असावी त्याप्रमाणे हे आकार आहेत. परंतु तिरक्या रेषा, त्यामधून अगदी एकाच ठिकाणी वापरलेली गडद छटा व त्यातून मिळालेली खोली चित्राची लज्जत वाढवते. केवळ रंगीत चित्रच दर्जेदार असतं असं नव्हे, तर मोजक्या आकारांमधूनसुद्धा एक दर्जेदार चित्र बनू शकतं याचं हे चित्र उत्तम उदाहरण आहे.

Comments
Post a Comment