Posts

Showing posts from November, 2023

Jeremy Annear

Image
  Artist: Jeremy Annear | Palimpsest 2 | 2017 | Oil on primed card | 45 x 22 cm.  भौमितिक आकारातून साकारलेली ही चित्ररचना रंग आणि पोत यांच्या सहयोगाने खूप उठावदार बनली आहे. चित्राच्या मध्यभागी असणारी जादूच्या छडीसारखी भासणारी आकृती पिवळ्या आणि जांभळ्या रंगामुळे फोकल पॉइंट बनली आहे. चित्रात इतरत्र कुठेच शीतरंग नाही त्यामुळे हा जांभळा रंग मला थोडा खटकला. कदाचित त्या ऐवजी पिवळसर पांढरा रंग देखील संयुक्तिक ठरला असता असं वाटलं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत. चित्राची सुयोग्य फ्रेम चित्राला अधिक उठाव देते हेही आपल्याला इथे लक्षात येईल.  - श्रीराम हसबनीस

Vikram Kulkarni

Image
  चित्रकार: विक्रम कुलकर्णी.  माझ्या आवडत्या चित्रकारांपैकी एक. कलाकार, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि त्याची कला हे अनेकदा अगदी अभिन्न होऊन जातं. काही कलाकार कलेत वेगळे दिसतात आणि व्यक्ती म्हणून वेगळे असतात. पण जो कलाकार अगदी नैसर्गिक सहजतेने कलेशी एकरूप होतो त्यामध्ये त्याचं व्यक्तित्वदेखील डोकावतंच. विक्रम यांच्या चित्रांमध्ये एक शांतता आहे, लोभसपणा आहे, तरलता आहे. अवकाश, बिंदू, रेषा, आकार आणि रंग यांच्यामधील सुखसंवाद त्यांच्या चित्रांत अतिशय हळुवारपणे उलगडतो. हा माणूस सहसा कुणाला दुखवत नसावा असं चित्र पाहूनही वाटतं. कारण तीच संवेदनशीलता चित्रात आहे. ते अनेक माध्यमात काम करतात. विशेष म्हणजे अमूर्त शैलीतील चित्रे हा त्यांचा प्रमुख चिंतनविषय असला तरीही त्यांची जलरंगातील निसर्गचित्रेदेखील तितकीच उत्कट आहेत. सदर चित्रात केशरी आणि त्याचा विरोधी रंग निळा हे एकमेकांना इतके पूरक आहेत आणि त्यात लाल रंगाच्या तुकड्याने मध्यस्थी करून संवाद अधिकच रोचक बनविला आहे. पारदर्शकता, रंगलेपन, आकारांचा साधेपणा या गोष्टींनी चित्र आणखीनच वैशिष्टयपूर्ण बनले आहे. आपण विक्रम यांची इतरही चित्रं जरुर पहावीत....

Piet Mondrian

Image
  Artist: Piet Mondrian | Composition with Yellow, Blue and Red (1937-1942) | Oil on canvas | Aquisition- Tate Gallery |   नव चित्रकलेचे वारे वाहू लागले त्या काळात म्हणजेच विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पारंपारिक चित्रविषय, चित्रमाध्यम या सगळ्या गोष्टींना बगल देऊन रचनेच्या अगणित सौंदर्य कल्पनांच्या विश्वात विहार करणे अनेक कलाकारांनी स्वीकारले. त्यातूनच निरनिराळे प्रयोग होऊ लागले. त्यातीलच एक प्रयोग आपण इथे पाहतो आहोत. मोंड्रियन या चित्रकाराने केवळ ९० अंशात परस्परांना छेदणाऱ्या काही रेषा, त्यातील काही भाग मोजक्या रंगाने भरून हे चित्र काढले. तुम्हास वाटेल की यात कसब किंवा कौशल्य काय? इथेच आपल्यास कला आणि कौशल्य यांची कलाकृतीत सांगड कशी असते हे पाहावे लागेल. वरकरणी हे सोपे वाटते. परंतु विषम अंग रचना आणि त्यातून साधला गेलेला एकूण आकृतीबंध हेच या चित्राचे वैशिष्ट्य. शिवाय प्रथम असा प्रयोग मांडणाराचे महत्त्वही असतेच नाही का? नंतर त्याची कॉपी करणे सहज शक्य असते, पण प्रथम मांडला गेलेला आविष्कार त्या कलाकाराचे इतिहासातील स्थान अधोरेखित करतो.

Sayed Haider Raza

Image
  Artist: Sayed Haider Raza  (1922-2016), Mont-Agel, 1964. Oil on canvas. 45⅝ x 35 in (115.9 x 88.9 cm)  रझा आणि बिंदू हे जरी समीकरण रूढ असलं तरीही त्यांनी अनेकविध अंगांनी आपली कला बहरत नेली आहे. त्यांच्या दीर्घ कला कारकीर्दीत आपल्याला त्याच्या अनेक खुणा सापडतात. प्रस्तुत चित्रात त्यांचं समृद्ध असं रंगभान आपल्याला चित्रात खिळवून ठेवतं. आज दीपावलीच्या निमित्ताने हे चित्र शेअर करताना सहजच रात्रीच्या गर्भातून उमलणारी उबदार अशी प्रभातवेळ आपल्याला या चित्रात जाणवू लागते. शुचिर्भूत अशा एखाद्या तेजस्वी योग्याच्या ललाटावर शोभून दिसणारा शेंदूर तपोतेजात भरच टाकतो त्याप्रमाणे या चित्रातला केशरी ठिपका देखील या चित्राची आभा पसरवतो.  दीपावलीच्या निमित्ताने आपणा सर्वांस शुभचिंतन!  - श्रीराम हसबनीस ------------------------------------------- Artist: Sayed Haider Raza  (1922-2016), Mont-Agel, 1964. Oil on canvas. 45⅝ x 35 in (115.9 x 88.9 cm)  In the realm of artistic expression, Raza and Bindu, though steeped in tradition, have woven their diverse facets of artistry. ...

Pierre Auville

Image
Artist: Pierre Auville | 2014 | Pigmented Cement on board | 120 cm. x 120 cm.  ताजेतवाने रंग बघायाला सगळ्यानाच आवडतं. पण आवड जशी मुरत जाईल तसं earth shades म्हणजेच मातकट छटादेखील विलोभनीय वाटतात. आपण शेणानं सारवलेल्या अंगणात रांगोळी पाहिलीच आहे. त्यावर उठून दिसणाऱ्या पांढऱ्या रेषा किंवा ठिपके किती गोड दिसतात. आता या चित्रात देखील कुठेच अन्य रंग नाही. सगळ्या छटा एकाच रंगकुटुंबातल्या. तरीही त्यातून एक संवाद निर्माण झाला आहे. जसजसा बघण्याचा व्यासंग वाढेल तसा हा नाद ऐकू यायला लागतो. मग खरी गम्मत किती मोजक्या गोष्टीत असते याचा प्रत्यय येतो.  - श्रीराम हसबनीस

Parshwanath Nandre

Image
  चित्रकार: पार्श्वनाथ नांद्रे.  केवळ रंग आणि अवकाश यांच्यातून दृक अनुभव देणारं हे चित्र खूप प्रभावी आहे, लक्षवेधक आहे. ठोस किंवा करकरीत कडांपासून फारकत घेउन स्वप्नील अशा रंगांच्या दुनियेत नेणं सोपं नाही. गायतोंडे यांचा कलाप्रवास देखील अत्यंत कमी आकारातून कलाविधान मांडणारा होता. पार्श्वनाथ यांची चित्रं पुढील काळात विशेष ठसा उमटवतील असा विश्वास आहे. माझ्या या चित्रकार मित्राला खूप खूप शुभेच्छा!

Suchita Tarde

Image
  Artist: Suchita Tarde.  या सुंदर चित्रातले आकारांतले वेगळेपण पाहत राहिले तरी आपण बराच वेळ हे चित्र पाहू शकतो. कोणता आकार कुठे ठेवला आहे आणि त्यामुळे एकूण चित्रावर त्याचा काय परिणाम झाला आहे हे पाहणं मोठं रंजक आहे. नंतर येतो तो भाग म्हणजे त्या विशिष्ट आकाराला दिलेली विशिष्ट रंगछटा. त्यातल्या नेमकेपणामुळे चित्राला एक बांधेसूदपणा प्राप्त झाला आहे. चित्रात लाल रंग वापरणं हे नेहमी एक आव्हान असतं, पण सुचिता ताईंनी या चित्रात लाल रंग इतका छान खेळवला आहे की वाह..!