Artist: Victor Pasmore. जग असंख्य आकारांनी रेषांनी आणि रंगानी वेढलेलं आहे. त्यातीलच काही मोजके आकार घेऊन त्या आकारसंचातून एक रचना साधण्याचा प्रयत्न या कलाकाराने केला आहे. आपल्याला लॅम्प शेड, हेडफोन किंवा एखादी मॉडर्न चेअर याच्याशी साधर्म्य साधणारे आकार या चित्र दिसतात. परंतु इथे या आकारांची ओळख अभिप्रेत नाही, तर त्यांच्या परस्पर संबंधातून, रचनेतून साधला जाणारा एक दृश्यमेळ हाच एक उद्देश. आता त्यातील आकारांना रंगांचा साज चढवताना एखादी कलर पॅलेट निवडून त्यातील फिकट अथवा गडद छटांचा वापर कुठे, कसा आणि किती प्रमाणात करावा हा त्यानंतरचा टप्पा. आपण एखाद्या रेसिपीमध्ये ज्याप्रमाणे तिखट, मीठ, हिंग, जिरे, गूळ, हळद यांचे प्रमाण त्या त्या रेसिपी वर ठरवतो तसंच काहीसं चित्रात देखील तुम्हाला दिसेल. एकूण काय पदार्थ रुचकर व्हावा. अमूर्त शैलीत मात्र प्रत्येकाला एकाच पदार्थाची चव वेगवेगळी लागते इतकंच. आनंद मात्र सर्वांना मिळतो, अर्थात थोडी सवय झाल्यानंतर.