Posts

Showing posts from October, 2023

Anthe Zacharias

Image
Artist: Anthe Zacharias 1959| Oil on canvas  | 44 x 48 in या चित्रातल्या गर्द गडद करड्या रंगातून हलकासा निळा झिरपतो. डावीकडे वरती उष्ण असा पिवळसर केशरी आणि लाल रंग चित्रात उब आणतो. तो चित्राचा केंद्रबिंदू आहे. आपलं लक्ष पुन्हा पुन्हा तिथेच जातं. यालाच फोकल पॉइंट म्हणतात. प्रत्येक चित्रात असा लक्षवेधी फोकल पॉइंट असावाच असा नियम नाही. काही चित्रांत सतत फिरवत ठेवणारी गतीमानता असते. या चित्रात रंगलेपन हेही वैशिष्ठ्य आहे. रंगांचे जाड थर, ते लावतानाच्या ब्रशच्या खुणा, एकाच स्ट्रोक मध्ये दडलेल्या दोन तीन छटा अशा अनेक गमतीजमती चित्रात असतात. म्हणून शक्य तितकी चित्रे प्रत्यक्ष पाहण्याची संधी सोडू नये. असं पाहणं आपल्याला समृद्ध करत असतं.

Sharad Tarde

Image
  चित्रकार: शरद तरडे | 12X18 in. | Acrylic on paper | 2019.  चित्रकार आणि शिल्पकार श्री. शरद तरडे यांची चित्रं अमूर्त कलेबद्दल ओढ निर्माण करण्याची ताकद बाळगून आहेत. विशेष म्हणजे त्यांची चित्रं कधीच एका ठराविक पद्धतीने रंगवलेली नसतात, म्हणूनच ती विशेष असतात. Minimalistic म्हणजेच आपल्याला जे सांगायचं आहे ते थोडक्यात सांगावं असं हे चित्र आहे. संध्या छायेचा तांबूस रंग त्याच्या अनेक केशरी, लाल अशा छटांमधून चित्रभर व्यापून आहे. उभ्या चित्र चौकटीला छेद देणारी आडवी गडद रेषा आपल्याला चित्रात ओढते. ती रेषदेखील काही अस्पष्ट आकार बाळगून आहे. त्यामुळे बघणाऱ्याला त्या रेषेत अनेक आभास होऊ शकतात. क्लिष्ट आकार नसल्यामुळे दर्शक चित्रात, मुख्यत: रंगात रमतो.

Franz Kline

Image
  Artist: Franz Kline.  मी आर्ट कॉलेजमध्ये असताना लायब्ररी मधल्या पुस्तकात अमेरिकन abstract expressionist फ्रांझ क्लाईनची काही चित्रं पाहिली होती. अतिशय वेगवान आणि ताकदवान अशा स्ट्रोक्सनी माझं मन मोहून घेतलं होतं. या माणसाने केवळ काळा आणि पांढरा रंग वापरून ही भल्या मोठ्या आकाराची चित्रं काढली. खरं तर अधिकाधिक चित्रकाराचा ओढा रंगांकडे असतो. फारच थोडे चित्रकार आहेत ज्यांनी आयुष्यात केवळ काळया पांढऱ्या रंगात चित्रं रंगवली. क्लाईनची चित्रं आपल्याला बांधून ठेवतात. स्तब्ध करतात. आकार आणि अवकाश यांचं गहिरं नातं उलगडण्याचा हा प्रवास आपल्याला थक्क करतो.  - श्रीराम हसबनीस (२२ ऑक्टो. २०२३)

Mashiul Chowdhury

Image
  Artist: Mashiul Chowdhury.  हे चित्र पूर्णत: अमूर्त नाही, परंतु एखादे निसर्गचित्र अमूर्ततेकडे कसे झुकते याचा हा एक सुंदर नमुना. पहा ना. इथे टॉवर असलेल्या इमारतीचा आभास अगदी कळेल न कळेल इतकाच ठेवला आहे. आकाश आणि वास्तू स्पष्टपणे एकमेकांपासून वेगळ्या दिसतात. तरीही त्यांच्या कडा कुठेही करकरीत नाहीत. आकारांच्या कडांचे संतुलन हा एक खूप महत्त्वाचा घटक अमूर्त चित्रांत आपल्याला पाहायला मिळतो. छाया प्रकाशाचा आभासदेखील हलकासा आहे. थोडक्यात असं की मूर्त आणि अमूर्त गोष्टी आपल्याला एकमेकांपासून तोडता येत नाहीत. मूर्तात अमूर्त दडलेले असतेच ते पाहणं हाच आनंद.  - श्रीराम हसबनीस (१९ नोव्हे. २०२३)

Prabhakar Kolte

Image
  चित्रकार: प्रभाकर कोलते.  भारतातील विद्यमान ज्येष्ठ चित्रकारांपैकी एक नाव, प्रभाकर कोलते. जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये अनेक वर्षे अध्यापक म्हणून त्यांनी योगदान दिलं. दृष्यकला या विषयावरचं त्यांचं लिखाण, व्याख्यान नेहमीच मार्गदर्शक असतं. नुकताच त्यांचा कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. आता त्यांच्या या चित्राविषयी. निळ्याशार भिंतीच्या पलीकडले उत्साहाचे उबदार रंग खिडकीतून पाहिल्याप्रमाणे भासतात. त्यांच्या बहुतेक चित्रांमध्ये रंगांच्या मुक्त ओघळामधून चमकणारे कवडसे चित्रात रंगत आणतात. उत्तम रचना असलेल्या त्यांच्या चित्रांत चित्रावकाशातील मोठा भाग सपाट आणि विरोधी छटेत रंगवून इतर नेमक्या जागी तजेलदार रंगांची छान पेरणी केलेली दिसते. त्यांचं हे रचना तंत्र ही त्यांची ओळख बनली आहे. जसे काही गायक हे गायकांचे गायक असतात तोच मान आज कोलते यांना चित्रकारांचे चित्रकार असा दिला जातो. - श्रीराम हसबनीस 

Wassily Kandinsky

Image
  चित्रकार: Wassily Kandinsky.  १९व्या शतकाच्या अखेरीस प्रस्थापित दृश्यकलेच्या निकषाना बाजूला सारून या चित्रकाराने केवलाकारी चित्र परंपरेचा पाया रोवला. आकार आणि नाद यांचा परस्पर संबंध चित्रातून कशा प्रकारे व्यक्त करता येईल याचा त्याने विचार केला. रेषा, गोल, त्रिकोण, आयत अशा मूलभूत भौमितिक आकाराना चित्रावकाशात कशा प्रकारे मांडल्यास त्यातून विशिष्ट संवेदनाची निर्मिती होऊ शकेल याचं दृश्यचिंतन मांडलं. पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा हा प्रवास खूप महत्त्वाचा ठरतो.

Mark Rothko

Image
  चित्रकार: MARK ROTHKO (1951)  शीर्षक: क्र.6 (violet, green and red)  अमूर्त शैलीतील अनेक प्रयोग विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. त्यापैकी जगभरात आजही ज्या चित्रकाराच्या चित्रांचा गवगवा होतो ते नाव म्हणजे मार्क रोथको. आकारांशिवाय केवळ रंगांचा वापर करून आपण चित्रांमध्ये काही संवेदना निर्माण करू शकतो का याचा प्रामाणिक प्रयत्न रोथको यांच्या चित्रात दिसतो आणि या प्रयत्नात ते कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. दुसरं असं, की त्यांची चित्र अतिशय मोठ्या आकाराची म्हणजे जवळपास एका भिंतीच्या आकाराएवढी आहेत. त्यामुळे एखादा रंग कोणत्या आकारात तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यानुसार त्या रंगाचा तुमच्यावर होणारा भावनिक परिणाम अवलंबून असतो आणि याचीच अनुभूती रोथको यांच्या चित्रांना डोळ्यासमोर पाहताना रसिकांना आजवर मिळत आली आहे. आणि म्हणूनच आजही रोथको यांच्या चित्रांची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. रोथकोची चित्रं पहायची म्हणजे एक प्रकारे ध्यान क्रियाच म्हणावी लागेल. आपण त्या रंगात एकजीव होतो आणि आपल्याला इतर भान राहत नाही. हीच या चित्रांची यशस्विता.

Deborah Tarr

Image
चित्रकार: Deborah Tarr.  शांत अशा निळ्या रंगांच्या विविध छटांनी गुंफलेलं हे चित्र. दृश्य जगात जसं आपण छायाप्रकाश पाहतो, तसंच काही अमूर्त चित्रांमध्ये छटांच्या योजनेतून आपल्याला छायाप्रकाशाचा आभास होऊ लागतो. एक रचना म्हणून चित्रात गम्मत आणण्यासाठी चित्रकार जवळजवळच्या हलक्याशा छ्टा अशा ठिकाणी ठेवतो की आपली दृष्टी चित्रात खिळून राहते. काही चित्रांत फोकल पॉइंट असतो, तर काही चित्रांत तो नसतो. इथे तो आहे. मध्यभागी असणारे तीन निळे ठिपके आपलं लक्ष वेधून घेतात. इतर छोटे मोठे आकार त्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकूणच हे चित्र आल्हाददायक आणि रम्य वाटते.

Matthew Dibble

Image
  चित्रकार: Matthew Dibble  माध्यम: तैलरंग आकार: २२८.६ सें. मी.(रूंदी) X १९०.५ (लांबी) सें. मी.  हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला कदाचित भेगाळलेली जमीन किंवा भिंतीचे पोपडे आठवतील. या चित्रात कलात्मक काय आहे असाही कदाचित प्रश्न पडेल. कारण तसं म्हटलं तर यात खूप काही आकर्षक रंगही नाहीत. बघितलं तर पांढऱ्या रंगावर काळया रेषा. पण या रेषा एकमेकांशी फेर धरून नाचत आहेत असं नाही का वाटत? त्या रेशांमधील वैविध्य आणि त्यांचं परस्परांशी असणारं नातं खूप आनंददायी आहे. खूप चित्रं पाहिल्यानंतर हळूहळू हे नातं तुम्हाला जाणवू लागेल. या रेषाही तुमच्याशी बोलू लागतील.

Jeane Myers

Image
  चित्रकार: Jeane Myers.  या पद्धतीच्या चित्राला आम्ही चित्रकार मंडळी लिमिटेड पॅलेट मध्ये रंगवलेलं चित्र म्हणतो. म्हणजे काय, तर जसं या चित्रात प्रामुख्याने पिवळसर तपकिरी रंग आणि हलकासा निळसर रंग वापरला आहे. म्हणजे रंग दोनच वापरले, परंतु त्यांच्या कितीतरी फिकट ते गडद छटा या चित्रात वापरल्या आहेत. यातून अतिशय सुरेख पोत साधला आहे जो आपलं लक्ष खिळवून ठेवतो. पोत हादेखील चित्राचा महत्त्वाचा भाग असतो. सपाट रंगलेपन करून हा परिणाम साधता आला नसता. असे पोत मिळवण्यासाठी चित्रकार अनेक प्रयोग करीत असतो. कधी नाईफ, कधी रोलर किंवा काहीही. पण त्यामुळे चित्रात एक प्रकारे त्रिमित आभासी वातावरण तयार होते. तुम्हाला या चित्रात काय भावलं हेही मला जाणून घ्यायला आवडेल.